फीटल एकोकार्डिओग्रॅम काय आहे ?
बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत असलेल्या जोडप्याला बाळामध्ये (भ्रूण) एखादा जन्मजात दोष तर नसेल ना याची भीती वाटत असते. गर्भावस्थेच्या १८व्या आठवड्यामध्ये केल्या जाणा-या अनॉमली स्कॅनमध्ये बाळाच्या डोक्यापासून ते पावलांपर्यंत संपूर्ण स्कॅनिंग केले जाते व बाळामध्ये एखाद्या प्रकारचा जन्मजात दोष आहे का हे तपासले जाते. सर्वच गरोदर स्त्रियांना ही तपासणी करून घेण्याची शिफारस केली जाते. या जन्मजात दोषांमध्ये हृदयदोष हा सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो. सर्वसाधारण अनॉमली स्कॅनमध्ये बाळाच्या हृदयाच्याही काही प्रमाण प्रतिमा घेतल्या जातात. मात्र अनेक कारणांमुळे भारतील अनेक गर्भवती स्त्रियांच्या बाबतीत अशा प्रतिमा घेणे शक्य होत नाही. भ्रूणावस्थेतील बाळाचा मेंदू, मूत्रपिंडे इत्यादींच्या तुलनेत हृदयाची रचना ही प्रतिमा मिळविण्याच्या दृष्टीने आव्हानात्मक असते. अनॉमली स्कॅनमध्ये हृदयदोषाचा संशय आल्यास फीटल एकोकार्डिओग्राम काढून घेणे गरजेचे ठरते.
फीटल एकोकार्डिओग्राफी (Fetal Echocardiography) ही एक अल्ट्रासाउंड चाचणी आहे. या चाचणीद्वारे भ्रूणामधील हृदयदोषाचे निदान होऊ शकते. गरोदरपणामध्ये केल्या जाणा-या मातेच्या अल्ट्रासाउंड चाचणीप्रमाणेच ही चाचणीही केली जाते. फीटल एकोकार्डिओग्राफी करणारी तज्ज्ञ व्यक्ती ही एकतर बाल हृदयरोग विशेषज्ज्ञ अर्थात पेडिऍट्रिक कार्डिओलॉजिस्ट असते किंवा फीटल एकोकार्डिओग्राफीतील विशेषज्ज्ञ असणा-या रेडिओलॉजिस्टद्वारे ही चाचणी केली जाते. तपासणीच्या वेळी एखादा लक्षणीय हृदयदोष सापडल्यास पेडिऍट्रिक कार्डिओलॉजिस्ट भावी पालकांना त्याविषयीचा सल्ला देऊ शकतात. बाळाच्या जन्माच्या वेळी काय घडू शकते, कोणत्या गोष्टींची तयारी करून ठेवावी लागेल, कोणत्या प्रकारचे वैद्यकीय हस्तक्षेप महत्त्वाचे ठरतील व ते कोणत्या वयामध्ये करणे योग्य ठरेल, हृदयदोष दुरुस्त केल्यानंतर रोगाविषयी कोणते दीर्घकालीन अनुमान काढता येईल इत्यादी गोष्टींविषयी माहिती देऊ शकतात.
दुस-या बाजूला फीटल एकोकार्डिओग्राम(Fetal Echocardiogram) व्यवस्थित आल्यास जोडप्याला दिलासा मिळू शकतो. सध्याच्या काळात गरोदर महिलेच्या नियमित स्कॅनिंगमधूनच (अनॉमली स्कॅनिंग) भ्रूणावस्थेतील बाळाच्या हृदयाच्या सर्वसामान्य रचनेतील अनेक प्रकारची अनैसर्गिकता टिपली जाऊ शकते. पेडिऍट्रिक कार्डिओलॉडिस्ट यातील निरुपद्रवी (बिनाइन) स्वरूपाच्या अनैसर्गिकतांविषयी महिलेचे व तिच्या कुटुंबाचे समुपदेशन करू शकतात. यामुळे कुटुंबियांना वाटणारी चिंता कमी होऊ शकते.
फीटल एकोकार्डिओग्राम्स सर्वसाधारणपणे गर्भावस्थेच्या दुस-या तिमाहीमध्ये, मुख्यत: १८-२२व्या आठवड्यामध्ये काढले जातात. यात नेहमीच्या स्कॅनप्रमाणेच मातेच्या पोटावर प्रोब ठेवले जाते मात्र या चाचणीमध्ये बाळाच्या हृदयावर लक्ष केंद्रित केले जाते.
पुढील स्थिती आढळून आल्यास डॉक्टर्स थेट फीटल एकोकार्डिओग्राम करून घेण्याचा सल्ला देतात:
- ११-१३व्या आठवड्यात केलेल्या प्रेग्नन्सी अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये भ्रूणामध्ये nuchal thickness (NT) आढळून आल्यास
- १८व्या आठवड्यात रेडिओलॉजिस्टद्वारे केल्या गेलेल्या ‘स्क्रीनिंग हार्ट व्ह्यूज’ अल्ट्रासाऊंड तपासणीमध्ये अनैसर्गिकता आढळून आल्यास
- भ्रूणाच्या शरीररचनेमध्ये इतर कोणत्याही प्रकारची अनैसर्गिकता आढळून आल्यास
- कुटुंबात जन्मजात हृदयदोषाचा पूर्वेतिहास असल्यास
- मातेला मधुमेह किंवा ल्युपस आजार असल्यास
- गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात काही विशिष्ट औषधे घेतलेली असल्यास
- रुबेला किंवा इतर TORCH प्रकारातील म्हणजे गर्भावस्थेत अथवा प्रसूतीच्या वेळी मातेकडून बाळामध्ये संक्रमित होऊ शकणा-या आजारांचा संसर्ग झालेला असल्यास
- इन व्हिट्रो फर्टालायझेशन (आयव्हीएफ) किंवा असिस्टेड रिप्रोडक्शन पद्धतींद्वारे गर्भधारणा झालेली असल्यास
अगदी सर्वोत्तम तज्ज्ञांकडून केल्या गेलेल्या फीटल कार्डिओग्राफीमधूनही काही मोजके हृदयदोष लक्षात यायचे राहून जाऊ शकतात. प्रसूतीनंतर नवजात अर्भकाच्या हृदयाच्या स्थितीविषयी बालरोगतज्ज्ञांना एखादी शंकास्पद गोष्ट आढळून आल्यास बाळाचा एकोकार्डिओग्राम काढून घेणे आवश्यक ठरते.